२० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले

कांदा सडला,www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– केंद्राने अचानक केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे मुंबईत १७० कंटेनर अडकून पडले असून, त्यामुळे २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा व्यापारी आणि उत्पादक संतप्त झाले आहेत.

दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी या विषयावर सोमवारी (दि. 11) बैठक बोलावली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीअगोदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांची भेट घेतली आहे. सोमवारीच चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे या प्रश्नावरून रास्ता रोको करणार आहेत. आतापर्यंत कांदा प्रश्नावर शरद पवारांनी कधीच आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. पहिल्यांदाच ते हे आंदोलन करणार असल्यामुळे या आंदोलनाची मोठी चर्चा आहे. त्यात हे आंदोलन लक्षवेधी ठरावे, यासाठी राष्ट्रवादीसह शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सरकारही खडबडून जागे झाले आहे.

निर्यातबंदीमुळे कांदा जागेवरच पडून असल्याने चांगला कांदा सडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लिलावबंदी असल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत. यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, निर्यातीला पाठवलेला १७० कंटेनर कांदा हा मुंबईत बंदरावर अडकून पडला आहे. हा कांदाही खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे या प्रश्नावरून रास्ता रोको करणार आहेत. यावेळी फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा संघटनेच्या विविध मागण्यांसाठी शरद पवार यांना पत्र देणार आहेत.

निर्णय पूर्णपणे अन्यायकारक

निर्यातबंदी अधिसूचनेची वेळ आणि हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. वारंवार निर्यातीवरील निर्बंधांमुळे परदेशी बाजारपेठेतील भारताची पकड कमी होत आहे. या आकस्मिक निर्बंधांमुळे, निर्यात प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर कांदा अडकल्यामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. वरील अधिसूचना 7 डिसेंबर 2023 रोजी जारी केली असली, तरी व्यापाऱ्यांना 8 डिसेंबर 2023 रोजी रात्री 8 नंतरच राजपत्रित केले आहे. अशा प्रकारे निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात कंटेनर हे बंदरातच अडकले आहेत.

हेही वाचा :

The post २० कोटींहून अधिकचा कांदा सडण्याची भीती, १७० कंटेनर अडकले appeared first on पुढारी.