59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले

सायबर गुन्हेगार

नाशिक : गौरव अहिरे

सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांनुसार भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने नाशिककरांना चालू वर्षात ५९ प्रकरणांमध्ये ६ कोटी ६२ लाख ९९ हजार ४३३ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. सर्वाधिक फसवणूक नोकरीचे आमिष दाखवून झाली असून, विशेष बाब म्हणजे त्यात उच्चशिक्षित वर्ग सर्वाधिक बळी पडल्याचे उघड झाले आहे.

कोरोनानंतर नागरिकांमध्ये इंटरनेट वापराचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फायदा भामट्यांनीही घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार यंदा ऑनलाइन पद्धतीने घरी बसून भामट्यांनी नाशिककरांना पार्ट टाइम जॉब, क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक, लॉटरी, फ्रॉड कॉल, गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ६ कोटी ६३ लाख रुपयांचा गंडा घातला आहे, तर फसवणूक झालेले काही तक्रारदार अद्यापही पोलिसांपर्यंत आलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. फसवणूक करणारी परराज्यातील गुन्हेगारांची टोळी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या गुन्हेगारांनी गरीब नागरिकांच्या नावे बँक खाते सुरू केले आहे. तसेच सीमकार्ड घेऊन त्याद्वारे नागरिकांना गंडा घालत आहेत. त्यामुळे मुख्य सूत्रधारांना पकडण्यात अडचणी येत असल्याचे समजते. काही प्रकरणांमध्ये, फसवणूक झालेल्यांनी तक्रार उशिरा केल्याने त्यांना आर्थिक परतावा मिळवून देण्यातही सायबर पोलिसांना अडचणी येत आहेत.

प्रीपेड टास्कचे आमिष दाखवून गंडा

दाखल गुन्ह्यांनुसार भामट्यांनी नागरिकांना एक ते चार दिवसांत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियावरून संपर्क साधून पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले जाते. टास्क पूर्ण केल्यास आर्थिक परतावा देण्याचे सांगितले जाते. सुरुवातीस यूट्युबवरील व्हिडिओ लाइक करणे, रिव्ह्यू देणे यासाठी भामट्या नागरिकांना १ ते २ हजार रुपये बँक खात्यात टाकून विश्वास संपादन करतात. त्यानंतर प्रीपेड टास्क पूर्ण करण्याचे सांगत नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगितले जाते. त्यानंतर विमान तिकीट बुकिंग करणे, क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार, पैशांचे परकीय चलनात रूपांतर करणे आदी काम सांगून नागरिकांना आभासी पगार दाखवला जातो. स्क्रिनवर काही क्षणांत केलेल्या कामाचा मोबदला दिसत असल्याने लालसेपोटी अनेकांनी लाखाे रुपये भामट्यांना दिले. मात्र त्यांचा परतावा फक्त आभासी असल्याने त्यांना त्याचा लाभ होत नाही. अखेर पैसे संपल्यानंतर नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

अशी घ्या काळजी

– ऑनलाइन व्यवहाराआधी सायबर पोलिस किंवा संबंधित यंत्रणांकडे विचारपूस करावी.

– अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावरून संवाद साधू नये.

– आधारकार्ड-पॅनकार्ड कोणालाही देऊ नये.

उच्चशिक्षितांना गंडा

दाखल गुन्ह्यांनुसार फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांश नागरिक उच्चशिक्षित आहेत. त्यातही आयटी क्षेत्रातील व्यक्तींना सर्वाधिक गंडा घातल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कमी कालावधीत जास्त परतावा, सोप्या कामातून पैसे कमवण्याच्या मोहापायी नागरिक त्यांच्या मेहनतीचे पैसे भामट्यांच्या ताब्यात देत असल्याचे चित्र आहे. तसेच फसवणुकीतील मिळालेले पैसे परकीय चलनात रूपांतर करून तो पैसा परदेशात पाठवला जात असल्याचेही उघड झाले आहे.

नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी. शंका असल्यास सायबर पोलिसांकडे चौकशी करावी. त्याचप्रमाणे आपले बँक खाते किंवा सीमकार्ड दुसऱ्यास देऊ नये. त्या खात्यांवरून फसवणुकीच्या पैशांचे व्यवहार झाल्यास किंवा फसवणूक करताना सीमकार्डचा वापर झाल्यास संबंधित खातेधारक व सीमकार्डधारकाविरोधात गुन्हे दाखल होत आहेत.

रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

अशी झाली फसवणूक

फसवणुकीचा प्रकार दाखल गुन्हे फसवणुकीची रक्कम (रु.)
नोकरीचे आमिष 28 3,94,85,152
क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक 3 70,73,455
फोनवरून गंडा 7 61,52,724
केवायसी बहाणा 2 26,35,459
हरवलेल्या मोबाइलचा वापर 2 21,69,000
एनी डेस्क ॲप 2 18,66,000
गुंतवणुकीचे आमिष 3 16,07,427
लॉटरी-बक्षिसाचे आमिष 3 14,01,256
सेस्कटॉर्शन 1 12,48,000
जाहिरात 1 8,09,555
अनधिकृत मोबाइल बँकिंग ॲक्सेस 1 6,99,006
मेट्रोमनी 1 6,10,000
ओएलएक्स 1 6,05,000
महावितरण 1 2,13,000

हेही वाचा :

The post 59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले appeared first on पुढारी.