Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेच्या निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याचे समोर आले आहे. केंद्राच्या नेतृत्वाने नाव दिले असले तरी नावाची घोषणा होण्यात होणारा विलंब बघता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यातील १५ पैकी सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या आमदारांचे वर्चस्व आहे. मात्र, जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभेसाठी कुठेच संधी मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाशिकच्या जागेबाबत दावा कायम ठेवलेला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सहा आमदार निवडून आणत नाशिक राष्ट्रवादीला कसे सेफ आहे हे शरद पवार आणि कार्यकर्त्यांनी दाखवून दिले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मात्र, जिल्ह्यातील सहाही आमदार अजित पवारांसोबत गेले. अजित पवार गटाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीचे आमदार असल्याने या मतदारसंघांवर दावा केला होता. यासाठी नरहरी झिरवाळ यांचे नावदेखील पुढे आले होते. मात्र महायुतीने विद्यमान खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे नाव जाहीर करत मित्रपक्षांना कोणतेच स्थान दिले नाही. तर नाशिक लोकसभा मतदारसंघात सहापैकी दोन आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर चांगली पकड आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर खा. श्रीकांत शिंदेंनी गोडसे यांचे नाव जाहीर केले. नाराज मित्रपक्षांनी उघडउघड विरोध केला. त्यानंतर सुरू झालेला पेच अद्यापपर्यंत कायमच आहे.

वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. लवकरच निर्णय होईल. पक्ष जो निर्णय देईल त्यानुसार काम करता येईल.
– नितीन पवार,
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय व्हावा ही अपेक्षा. जेणेकरून महायुतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी प्रचार करता येईल.
– सरोज अहेर आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

अद्याप जागावाटपाचा तिढा मिटलेला नाही. उमेदवारीबाबत राष्ट्रवादीने आपला उमेदवार अशी आग्रही वेळो‌वेळी मागणी करण्यात आलेली आहे. आमचा दावा कायमच आहे.
– माणिकराव कोकाटे
, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

पक्षांतर्गत गोष्टी वेगळ्या असतात. युती असो वा आघाडी यामध्ये समीकरणे बनवणे सोपे काम नाही. वरिष्ठ पातळीवर बैठक सुरू असून, लवकरच निर्णय होईल.
नरहरी झिरवाळ, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

 

अद्याप नाशिकचा तिढा सुटलेला नाही. आमची मागणी रास्त आहे. नाशिक हा राष्ट्रवादीचा सेफ मतदारसंघ आहे. यामध्ये निवडून येण्याची संधी जास्त आहे. आम्ही दावा सोडणार नाही.
– दिलीप बनकर,
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

हेही वाचा: