‘इयरपॉड’ वापरण्याचा मोह पडला महागात, सराईत चोरटे जेरबंद

चोरटे जेरबंद,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंगल्यात घरफोडी करून चोरी केलेला नामांकित कंपनीचा ‘इयरपॉड’ वापरण्याचा मोह चोरट्यांना महागात पडला. इयरपॉड वापरल्याने तसेच घरातील सीसीटीव्हीत चोरट्याच्या हालचाली कैद झाल्याने दोघा सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. रोहन संजय भोळे (३७ रा. जयप्रकाश सोसायटी) आणि ऋषिकेश मधुकर काळे (२८ रा. गंधर्वनगरी) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच चोरट्यांनी केलेल्या चार घरफोड्यांची उकलही पोलिसांनी केली.

शहरासह जिल्ह्यातील आलिशान बंगले हेरून दोघे उच्चशिक्षित संशयित चोरटे अत्याधुनिक शस्त्रांद्वारे बंगल्याच्या खिडक्या, ग्रील तोडून भरदिवसा घरफोडी करीत होते. गंगापूर पोलिसांच्या हद्दीतील शारदानगर येथील शरण बंगल्यात २४ डिसेंबरला दुपारी १२.३० ते ४.३० या वेळेत घरफोडी झाली होती. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कट करून कपाटातील तिजोरी, रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह महागडे घड्याळ व इयरपॉड लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास गंगापूर व गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत होते. त्यात संशयितांनी चोरलेले इयरपॉड वापरल्यानंतर त्यांचा सुगावा मिळाला. तसेच घरातील सीसीटीव्हीतही चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली होती. रेकॉर्डवरील चोरटा असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेत पकडले. तसेच त्याच्या जोडीदाराला पकडून दोघा संशयितांकडून सात लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सखोल तपासात संशयितांनी गंगापूर पोलिसांच्या हद्दीत दोन, ओझर व सिन्नरमध्ये प्रत्येकी एक घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, शरद सोनवणे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

या आधी फास्टॅग, देहबोलीवरून पकडलेले

सन २०२२ मध्ये संशयितांनी उपनगर हद्दीत एका बंगल्यात घरफोडी केली होती. तेव्हा कारवरील फास्टॅग आणि एका स्टिकरवरून पोलिसांनी शोध घेतला होता. दोन्ही संशयितांची देहयष्टी आणि चालण्याची पद्धत यावरून पोलिसांनी ओळख पटवून दोघांना पकडले होते. तसेच गंगापूरच्या हद्दीतील घरफोडीतही सीसीटीव्हीत संशयितांची लकब बघितल्यावर पोलिसांना त्यांची ओळख पटली.

आधी रेकी मग घरफोडी

रोहन व ऋषिकेश हे दोघेही उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यांची रेकी करत असल्याचे उघड झाले. बंगल्यात कोणी नसल्याचा अंदाज आल्यानंतर अत्याधुनिक, हायड्रोलिक शस्त्रांनी घरफोडी करीत काही मिनिटांत घरफोडी करून किमतीऐवज चोरून दोघे पसार होत होते. मोकळ्या भूखंडाशेजारील घरांमध्ये घरफोडीस दोघे प्राधान्य देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहन घरफोडी करताना ऋषिकेश कारमध्ये बसून लक्ष ठेवत होता. तसेच रेकी करताना बंगल्यात कोणी आढळले तर शेठ आहेत का? असे विचारून घरात किती लोक आहे, याचा अंदाज घेत असे. बंगल्यात शिरल्यानंतर रोहन थेट ‘मास्टर बेडरूम’ मध्ये जाऊन तेथील किमतीऐवज चोरत त्यानंतर इतर खोल्यांमध्ये जाऊन चोरी करत होता.

रोहन मास्टरमाइंड

रोहन हा घरफोड्यांमधील मास्टरमाइंड असल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. रोहनने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून, ज्ञानेश्वर अभियंता आहे. ओझर येथे घरफोडीत काही न मिळाल्याने त्यांनी कार चोरली. त्यानंतर या कारचा वापर इतर घरफोड्यांमध्ये केला. घरफोडी करण्यासाठी रोहनने ऑनलाइन गॅस गन, हायड्रोलिक कटर, ग्राइंडर खरेदी केले. त्या जोरावर काही सेकंदांत रोहन ग्रील तोडून घरात शिरत होता.

‘इंट्रा डे’त लाखो गमावले

पोलिस तपासात रोहन हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असल्याचे उघड झाले. घरफोडी केल्यानंतर त्यातील मिळालेले पैसे तो इंट्रा ड्रे ट्रेडिंग करण्यासाठी वापरत होता. मात्र त्यात त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान त्याला झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच घरफोड्या करून त्याने अंदाजे एक ते दोन कोटी रुपयांचा किमतीऐवज चोरल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.

दोन्ही संशयित उच्चभ्रू परिसरातील बंगल्यांमध्ये घरफोडी करत. त्यासाठी अत्याधुनिक हत्यारे व वस्तू वापरत. घरफोडीत मिळालेला किमतीऐवज विक्री करून त्यातून आलेल्या पैशांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.

– विजय ढमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे-१

हेही वाचा

The post 'इयरपॉड' वापरण्याचा मोह पडला महागात, सराईत चोरटे जेरबंद appeared first on पुढारी.