नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत महायुतीचा गड लढण्यासाठी उमेदवार कोण, याची चर्चा महाराष्ट्रदिनी संपुष्टात आली असली तरी हा गड तिसऱ्यांदा अभेद्य राखण्यासाठी एकत्र आलेल्या चार पक्षांच्या एेक्याची वज्रमूठ आवळण्याचे महद्आव्हान राज्य नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे. पूर्वार्धात महायुतीकडून उमेदवारीसाठी ज्यांच्या नावाचा उदोउदो झाला, त्या बाहुबली नेत्याची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता गडद झाली आहे.
स्वकीयांसह भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रखर विरोध असताना विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी पक्षनेतृत्वाला विश्वास देत हेमंत गोडसे यांनी तिकीटाची पहिली लढाई जिंकली. वस्तुत:, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकच्या मैदानात उतरवण्यासाठी दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फर्मान काढले होते. स्वत: भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास दुजोरा दिला. मात्र, भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदाेलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आव्हानात्मक भाषा सुरू केल्याने भाजप नेतृत्व सावध झाले. भुुजबळ यांच्या नाशिकमधील उमेदवारीचा फटका राज्यात इतरत्र बसून पंचेचाळीस पार घोषणा प्रत्यक्षात उतरण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, या निर्णयाप्रत भाजप आल्याने कालौघात त्यांचे नाव मागे पडले.
तद्नंतरच्या घडामोडीत गोडसे नको तर मग शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, पालकमंत्री दादाजी भुसे या नावांवरही काथ्याकूट झाले. भरीस भर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणकराव कोकाटे यांचे नावही चर्चिले गेले. मात्र, ही तीनही नावे कोणत्या ना कोणत्या कारणाने महायुती नेतृत्वाच्या पसंतीस न उतरल्याने उमेदवारीची माळ अखेर हेमंत गोडसे यांच्या गळ्यात पडली. गेल्या दोन निवडणूकांत प्राप्त केलेल्या दमदार विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी गोडसे यांना घाम गाळावा लागणार आहे. कारण याआधीची सोपस्करता यावेळी दिसत नसल्याने त्यांना स्वकीयांच्याच नाकदुऱ्या ओढण्यात ऊर्जा खर्ची करावी लागणार आहे. विशेषत:, ज्या छगन भुजबळ यांची उमेदवारी अत्युच्च पातळीवर निश्चित होऊनही ती राज्यस्तरीय नेतृत्वाकडून अव्हेरली गेली, ते शल्य भुजबळ यांच्या मनात फार नसले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ती मनावरील खोलवर जखम ठरली आहे. ही बाब लक्षात घेता, राज्यभर ओबीसींचा आवाज बनलेले भुजबळ आपल्या कार्यकर्त्यांची कशी समजूत काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवाय, महायुतीचे जबाबदार नेते म्हणून भुजबळ हे गोडसेंच्या विजयासाठी मनापासून झोकून देतात का, याकडेही जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.
वाजेंचे कडवे आव्हान ?
महायुतीचे हेमंत गोडसे यांना तीन लोकसभा निवडणूकांचा अनुभव आहे. पैकी २०१४ आणि २०१९ अशा दोन वेळा त्यांनी विजयश्री प्राप्त केली आहे. त्या दोन्ही वेळी गोडसे यांनी अनुक्रमे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना पराभूत केले. यावेळी मात्र गोडसे यांच्यासमाेर सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. सर्वपक्षीय नेत्यांसाेबतचे मधुर संबंध, साधे राहणीमान आणि समाजमनाशी जुळलेली नाळ या राजकारणातील वेगळेपणामुळे वाजे यांना मोठे समर्थन लाभत असल्याचा दावा आघाडीकडून करण्यात येत आहे. तसे झाल्यास निवडणुकीपर्यंत गोडसे यांच्यापुढे कडवे आव्हान उभे राहू शकते, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
हेही वाचा –