नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. २२) राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणूक कार्यक्रमात नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना येत्या शुक्रवारपासून (दि. २६) नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे. नाशिकसाठी जलज शर्मा, तर दिंडोरीसाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वीचे शक्तिप्रदर्शन, अर्ज भरताना घ्यायची खबरदारी, अर्ज दाखल करताना किती व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश मिळणार, इथपासून ते अनामत रक्कम, निवडणूक खर्च व स्वतंत्र बँक खाते उघडणे अशा विविध पातळींवर माहिती अवगत करण्यासाठी राजकीय पक्षांची बैठक बोलाविण्यात आली आहे. बैठकीत राजकीय पक्षांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. या बैठकीला उपस्थित राहावे. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उमेदवारांंना शपथ बंधनकारक
लोकसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी २५ हजार रुपये अनामत शुल्क आहे. तसेच अन्य प्रवर्गासाठी साडे 12 हजार रुपये अनामत शुल्क असणार आहे. निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांना पारंपरिक व ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतरही त्याची प्रत काढून सोबत प्रतिज्ञापत्र जोडून उमेदवारांनी ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे समक्ष सादर करायची आहे. अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समक्ष शपथ घेणे बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा: