नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तिकिटावरून सुरू असलेली रस्सीखेच संपत नसल्याने, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. विशेषत: अण्णा, आप्पाची भूमिका काय असेल, याच्याच सर्वत्र गप्पा रंगल्या आहेत. अण्णाला तिकीट नाकारल्यास त्यांची भूमिका काय असेल?, आप्पाचा पत्ता कट केल्यास त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरावे की, याविषयी खरपूस चर्चा रंगत असल्याने नाशिककरांमध्ये ‘इलेक्शन फीव्हर’ दिसून येत आहे.
अण्णा म्हणून परिचित असलेले भाजप नेते दिनकर पाटील गेल्या दोन वर्षांपासून नाशिक लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असून, भाजपकडून उमेदवारीसाठी आस लावून आहेत. दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत’आप्पा’ गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आहे. तसेच दुसरे आप्पा म्हणून परिचित असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांचा ऐनवेळी पत्ता कट केल्याने, त्यांच्याही भूमिकेकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे. नाशिककरांच्या मते, दिनकरअण्णा पाटील यांना पक्षाने तिकीट नाकारल्यास ते बंडखोरी करू शकतात. अन्यथा दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी बसपाकडून उमेदवारी केली होती, असा प्रयत्न पुन्हा एकदा त्यांच्याकडून केला जाण्याची चर्चा सध्या रंगत आहे. दुसरीकडे, खासदार हेमंत आप्पा गोडसे यांचे तिकीट कापल्यास ते वंचितकडून उमेदवारी करू शकतात. अपक्ष म्हणून ते मैदानात उतरले तरी, महाविकास आघाडी अन् महायुतीच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात. तर नाराज विजयआप्पा करंजकर यांनी बंडखोरी केल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे गणित बिघडवू शकतात.
एकंदरीत महायुतीकडून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हा प्रश्न कायम असला तरी, संभाव्य शक्यतांवरून मतदारांमध्ये मात्र जोरदार चर्चा रंगत आहे. विशेषत: अण्णा, आप्पांविषयीच्या गप्पा जोरात असल्याने, नाशिककरांमध्ये सध्या निवडणुकीचा फीव्हर बघावयास मिळत आहे.
जॉगिंग ट्रॅक बनले चर्चांचा कट्टा
राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये संभाव्य घडामोडींची मतदारांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. विशेषत: शहरातील जॉगिंग ट्रॅक सध्या या चर्चांचा कट्टा बनल्याचे दिसून येत आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत राजकीय चर्चा केल्या जात आहेत. पानटपरी तसेच चहाटपऱ्यांवरदेखील राजकीय घडामोडींवर गप्पा रंगत आहेत. कोणास मतदान करायचे?, कोणता उमेदवार निवडून येईल?, याचादेखील मतदारांमध्ये अंदाज बांधला जात आहे.
हेही वाचा:
- Unveiling The Largest Apple Premium Partner Store by Unicorn in Wakad, Pune
- Nashik Crime | कहांडळवाडी शिवारातील पोल्ट्री फार्ममध्ये आढळला मृतदेह; चेहरा दगडांनी ठेचल्याने खून झाल्याचा संशय
- Pimpri : अवयव प्रत्यारोपणास प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
The post 'तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव' कट्टा चर्चांनी रंगला appeared first on पुढारी.