नावात झाला बदल! उमेदवारांनी दिली पुन्हा नव्याने छपाईसाठी प्रचारपत्रके 

प्रचारपत्रक www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जानुसार मराठी वर्णमालेनुसार बॅलेट पेपरवरील नावात बदल करण्यात आला असल्याने गोडसे यांनी ‘हेमंत तुकाराम गोडसे’ ऐवजी ‘गोडसे हेमंत तुकाराम’ असा नावात बदल केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजाभाऊ वाजे यांचे नाव आता तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. बॅलेट पेपरवरील उमेदवारांची यादी अंतिम केली जात असताना नावात बदल करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले होते.

उमेदवाराने अर्जावर नमूद केलेल्या नावाच्या आधारे मराठी वर्णमालेनुसार उमेदवारांची क्रमवारी करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी पहिले आडनाव लावून ‘गोडसे हेमंत तुकाराम असा अर्ज केल्याने तीनऐवजी दोन क्रमांकावर आले. तर दुसऱ्या क्रमांकावरील महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आता तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.  तसेच ‘आव्हाड झुंजार’ यांनीही त्यांच्या नावात बदल सुचवला असून ‘झुंजार आव्हाड’ असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवला. त्यामुळे पाचव्या क्रमाकांवरील त्यांचे नाव दहाव्या क्रमांकावर गेले आहे. तर सातव्या क्रमांकावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांचे नाव सहा क्रमांकावर आले आहे. प्रकाश गिरधारी कनोजे यांनीही ‘कनोजे प्रकाश गिरधारी असा बदल सुचविला त्यामुळे त्यांचे नाव २५ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर आले आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा बॅलेट पेपरवरील अनुक्रमांकच बदलल्यामुळे बाकी उमेदवार देखील सतर्क झाले. बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्यासह इतर उमेदवारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि बॅलेट पेपरवर झालेल्या बदलाबाबत वेळीच माहिती जाणून घेतली. अनुक्रमांकातील बदलामुळे शेवटी उमेदवारांनी पुन्हा नव्याने प्रचारपत्रके छपाईसाठी ऑर्डर दिल्या आहेत. तर त्यांचा पुर्वीच्या प्रचारपत्रकाचा खर्च वाया जाणार आहे.

हेही वाचा: