नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेले परिश्रम आणि लोकसभा निवडणुकीत नाशिकची उमेदवारी पक्षाकडेच राहावी, यासाठी यशस्वीरित्या आखलेली व्यूव्हरचनेचे फळ जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मिळाले असून, मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षाच्या उपनेतेपदी बढती दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपसमवेत सत्ता स्थापन केली तेव्हा नाशिकमध्ये उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला खा. हेमंत गोडसे यांचा अपवाद वगळता फारसा धक्का लागला नव्हता. मनपातील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते १२ नगरसेवकांसह शिंदे गटात सामील झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये उध्दवसेनेला सुरूंग लागला. बोरस्ते यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याची चुणूक दाखवत शिंदे गटाला उभारी मिळवून दिली. त्यामुळे जानेवारी २०२३ मध्ये त्यांची पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदावर निवड करण्यात आली होती. गेल्या १५ महिन्यांमध्ये बोरस्ते यांनी केवळ पक्ष बांधणी केली नाही तर विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे केले. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाद रंगला असताना बोरस्ते यांनी नाशिकची जागा शिंदे गटालाच मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेत पक्ष एकसंध ठेवला. त्याचे फलित बोरस्ते यांना मिळाले असून त्यांची शिंदे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने बोरस्ते यांच्या उपनेतेपदावरील नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे.
पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. आगामी काळात जिल्हाभर शिवसेनेचा झंजावात निर्माण केला जाईल. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले जाईल. नाशिक महापालिकेवर भगवा फडविला जाईल. – अजय बोरस्ते, उपनेते, शिवसेना (शिंदे गट)