काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

Temperature

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी (दि.२८) तापमानाचा पारा ३९.२ अंशांवर स्थिरावल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नाशिककरांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

मुंबई व कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात सरासरी दाेन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. नाशिकही त्याला अपवाद ठरलेले नाही. दक्षिण राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्णलहरींचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. कमाल तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचल्याने उन्हाचा तडाखा जाणवत आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत उन्हाचा सर्वाधिक जोर राहत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडत आहेत. तर उन्हाच्या तीव्र झळांमुळे अंगाची काहिली होत असल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे.

नाशिक : पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचा स्पष्ट परिणाम शहरांतर्गत दुपारच्या वर्दळीवरुन दिसून येत आहे. गुरुवारी (दि.२७) दुपारी संत गाडगे महाराज पूल असा निर्मनुष्य झाला होता. (छाया: हेमंत घोरपडे)

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उन्हाचा जोर पाहायला मिळतो आहे. मार्च एन्डिंगला पाऱ्याने चाळिशी गाठल्याने ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. उन्हाचा कडाका बघता शेतीची कामे सकाळी दहापूर्वी उरकूुन घेण्याकडे बळीराजाचा कल आहे. तसेच उन्हाचा चटका जाणवत असल्याने दुपारच्या सुमारास गावांमधील मुख्य रस्ते, बाजारपेठा ओस पडत आहेत. दरम्यान, राज्याच्या काही भागांत शुक्रवारी (दि.२९) ढगाळ हवामानाची शक्यता असली तरी पुढील तीन दिवस उष्णतेचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.

The post काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर  appeared first on पुढारी.