नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

पोलीस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिडकोत सराईत गुन्हेगार तथा राजकीय पदाधिकाऱ्यावर सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची घटना घडली. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांनी केली. तसेच इतर गुन्हेगारांची शोधमोहीम व शस्त्रे बाळगणारे, टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी (दि.१७) रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रेकॉर्डवरील २१७ गुन्हेगारांपैकी १४५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हत्यार बाळगणाऱ्या चौघांनाही ताब्यात घेतले आहे.

गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. या यादीच्या आधारे संशयितांच्या शोधासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले. पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी आणि प्रशांत बच्छाव यांच्या सूचनेनुसार सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी सराईत गुन्हेगार, तडीपार, वाँटेड, वॉरंटमधील संशयितांसह हिस्ट्रिशीटर तपासून त्यांना ताब्यात घेतले. १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १९ ठिकाणी पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने संशयितांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले.

दरम्यान, सिडकोत गोळीबार झाल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या आधीही सातपूरमध्ये गोळीबार झाल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यामुळे गोळीबार झाल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात असल्याचे बोलले जात आहे. मोठा गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी नियमित मोहीम राबवल्यास गुन्हेगारांवर कारवाईचा धाक राहील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कोम्बिंगमधील कारवाई

पोलिसांनी रेकाॅर्डवरील २१७ गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यापैकी १४५ गुन्हेगार सापडले असून, दोन तडीपार गुंडही आढळून आले आहेत. तर चौघांकडे शस्त्र आढळून आले आहेत. पोलिस आयुक्तांसह तीन पोलिस उपआयुक्त, चार सहायक पेालिस आयुक्त, १५ प्रभारी पोलिस निरीक्षक, २९ सहायक व उपनिरीक्षक, २७० अंमलदारांसह गुन्हे शाखा युनिट एक व दोनची पथके, तसेच गुन्हे शाखेकडील सर्व पथकांमधील कर्मचारी व अधिकारी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन appeared first on पुढारी.