निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्याची चाहूल लागताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन सुरू केले आहे. उपलब्ध पाणी आरक्षणानुसार १८ दिवसांची तूट दिसून येत असली तरी गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील पाणी उचलण्यासह अन्य पर्यायांचा वापर करून नाशिककरांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे भरली नाहीत. परिणामी मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्देशांनुसार मराठवाड्यासाठी नाशिक व अ.नगरच्या धरणांतून ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करण्यात आली. महापालिकेने नाशिक शहरासाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली होती. परंतु धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे; परंतु रोजचा पाणीवापर लक्षात घेता धरणातील साठा १८ दिवस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र या पाणीकपातीला विरोध झाला. आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर ठाकरे गटाचे अधिवेशनही नाशकात झाले. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीकपात सत्तारूढ गटाला परवडणारी नसल्याने पाणीकपात न करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यातच शहराची गरज भागविण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रशासनाकडून हाती घेतल्या जाणार आहेत. गंगापूर धरणात चर खोदून मृतसाठा जॅकवेलपर्यंत आणला जाणार आहे.

शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफुटात)
– गंगापूर धरण- ३८०७
– दारणा व मुकणे धरण- १५०७
– एकूण आरक्षण- ५३१४

पाण्याचा वापर (दशलक्ष घनफूट)
– १५ ते ३१ ऑक्टोबर- ३३४.६५
– १ ते ३० नोव्हेंबर- ५९३.६७
– १ ते ३१ डिसेंबर- ५९५
– १ ते ३१ जानेवारी- ६११.२७
– १ ते १२ फेब्रुवारी- २४०.१३
एकूण वापर- २३७४.१२

एकूण शिल्लक पाणी आरक्षण- २९३९.२६ दशलक्ष घनफूट.

दररोजचा पाणीवापर- ५५५.८ दशलक्ष लिटर्स.

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न appeared first on पुढारी.