काश्मीर, कुलू-मनालीसह, नैनीताल, शिमल्याला नाशिककरांची पसंती 

शिमला

नाशिक : निल कुलकर्णी

‘यस्तु संचारते देशान सेवेते यस्तु पंडीतान‌्

तस्त विस्तारता बुद्धी तैल बिंदू रवांभसी..’

जो व्यक्ती देश-विदेशात प्रवास करतो, ज्याला विद्वान लोकांचा सहवास लाभतो, त्याची बुद्धी पाण्यावर पडलेल्या तेलाच्या बिंदूप्रमाणे विस्तारत जाते. असा या सुभाषिताचा सार्थ. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे पर्यटन व्यवसायला बहर आला आहे. नाशिककरांनी पर्यटनासाठी यंदाही काश्मीर, शिमला, कुलू- मनाली, नैनीतालसह राज्यातील थंड हवेच्या पर्यटनाला पसंती दिल्याचे चित्र आहे. मे महिन्यातील या स्थळांवर जाण्यासाठी सवार्धिक पसंती असून, सर्वच सीटस‌् बुक झाल्या असल्याची माहिती येथील टूर आयोजित करणाऱ्या एजन्सीकडून मिळाली आहे.

गेल्या दीड- दोन दशकांत पर्यटन करणाऱ्याची संख्या लक्षणीय वाढली आहे. पूर्वी चारधाम आणि धार्मिक पर्यटनापर्यंत सीमित असलेले पर्यटन आज विलक्षण बदलत गेले. देशांतर्गत पर्यटनासह विदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचीही संख्याही मोठी झाली आहे. वाढत जाणाऱ्या उष्म्यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना नाशिककर पसंती देत आहेत. काश्मीर, शिमला, कुलू-मनाली, नैनीताल या थंड हवेच्या ठिकाणांना नाशिककर विशेष पसंती देत आहेत. यासह बजेटप्रमाणे राज्यातील पर्यटनासाठी माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी दोन ते तीन दिवस जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याची माहिती टूर कंपन्यांनी दिली आहे. आधीच्या पिढीतील लोक फार क्वचितच विदेशी टूरला जात. परंतु गेल्या दीड- दोन दशकांपासून युरोप सहलीला जाणाऱ्यांच्या संख्येतही राज्यातून वाढ नोंदवल्याचे पर्यटन अभ्यासक कॅ. नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

काश्मीरसह उत्तरेकडील थंड हवेच्या हिलस्टेशनला नाशिककर पर्यटक पसंती देत आहेत. आमच्या आगामी सर्वच टूरसाठी बुकिंगला मोठा प्रतिसाद लाभत आहे. मध्यमवर्गीय, शेतकऱ्यांना सहलीतून हवाई सफर देणाऱ्या टूर आम्ही आयोजित करत असतो. त्यातून मध्यमवर्गीयांना विमान सफर घडवल्याचे समाधान लाभते. कोविड काळानंतर नाशिककरांचे पर्यटन प्रचंड वाढले आहे. मे महिन्यातील आमच्या काश्मीर, उत्तरेकडील टूरचे बुकिंग जोरात सुरू आहे.

– नंदू गोपाळ शेटे, संचालक, साई शिवम‌् टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स

 

देशांतर्गत पर्यटनामध्ये काश्मीरला पहिली पसंती आहे तर नंतर पूर्वाेत्तर भागातील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम या भागातही पसंती मिळत आहे. विदेशासाठी स्विर्त्झलॅण्ड, युरोपीय देशांना पसंती आहे. देशापासून समीप असलेल्या आणि पासपोर्ट व्हिसाची गरज नसल्याने नेपाळ, भूतान या देशांमध्येही राज्यातील पर्यटक पसंती देत आहेत. लोकांची क्रयशक्ती वाढल्याने विदेशात गेल्या दोन अडीच दशकात पर्यटन प्रचंड वाढले आहे.

– कॅ. नीलेश गायकवाड, पर्यटन अभ्यासक

 

अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या वाढली

नुकतेच लोकार्पण झालेले आयोध्येतील श्री राममंदिरातील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी नाशिककरांची पसंती यंदा अधिक आहे. स्वतंत्र रेल्वे आरक्षण करून अनेक कुटुंबांनी यंदा अयोध्येला जाण्याचे बेत आखले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील रामभक्तांना अयोध्येततील प्रभू श्रीरामचे दर्शन घडावे म्हणून विशेष रामलल्ला एक्स्प्रेसचे आयोजन भारतीय सहकारी पर्यटन विकास संस्था करणार आहे. जुलै महिन्यात रवाना होणाऱ्या या ट्रेनसाठी नाशिककरांनीही बुकिंग सुरू केली आहे. पुणे, कल्याण, नाशिकमार्गे ही ट्रेन अयोध्येकडे रवाना होणार आहे.

हेही वाचा –