मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

शिंदे गट pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटाला हादरा बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गत १५ फेब्रुवारीला घोलप यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता; परंतू त्यांच्या नाराजीची ‘मातोश्री’कडून कुठलीही दखल घेतली न गेल्याने अखेर त्यांनी शनिवारी(दि.६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारात स्वतंत्र घरोबा केल्यानंतर ठाकरे गटातील फूट अद्यापही कायम आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा देखील समावेश होता. शिर्डी मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी घोलप यांनी तयारी सुरू केली होती. परंतू ठाकरेंनी माजी खासदार भाऊसाहेब वाक‌्चौरे यांना पक्षात घेऊन त्यांना शिर्डीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे घोलप हे नाराज होते. त्यांनी तीन महिन्यापूर्वीच ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढली होती. परंतु, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे घोलप यांची नाराजी दूर होऊ शकली नव्हती. त्यांनी ठाकरे गटाच्या मेळावे, बैठकांना उपस्थित राहण्याचे टाळले होते. त्याचबरोबर त्यांच्या शिंदेंच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. १५ फेब्रुवारी रोजी शिवसैनिक पदाचा राजीनामाही त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठविला. मात्र त्यानंतरही ठाकरेंकडून दखल घेतली न गेल्याने अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी(दि.६) त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात १९९५ मध्ये शिवसेना भाजपचे सरकारमध्ये त्यांच्याकडे समाजकल्याण मंत्रीपद होते. शिवसेनेकडून ते २५ वर्ष आमदार होते.

नार्वेकर एक शिपाई: घोलप
घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, माझ्यावर अन्याय झाल्याचे मी संजय राऊत यांना सांगितले होते. त्यांनीही माझी वकिली केली नाही. मी राजीनामा देऊन दोन महिने झाले आहेत. तेव्हापासून मला कोणीही संपर्क साधला नाही. म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जात आहे. मिलिंद नार्वेकर एक शिपाई माणूस आहे. आम्ही पक्षात ५० वर्ष काम केले. मात्र आमचे ऐकून घेतले जात नाही. पक्ष फुटतो तरीदेखील नार्वेकर यांचेच ऐकतात. त्यांना एवढे महत्व का देत आहेत. मला संपर्कप्रमुख पदावरून का काढले? याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही, असेही घोलप यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' appeared first on पुढारी.