मालेगाव, नाशिकमधून जाणार ‘भारत जोडो न्याय यात्रा’

भारत जोडो न्याय यात्रा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी दक्षिण-उत्तर ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण केल्यानंतर कॉंग्रेसतर्फे दुसऱ्या टप्प्यात मणिपूर ते मुंबई अशी पूर्व-पश्चिम ‘भारत जोडो न्याय’ यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) जाहीर करण्यात आली आहे. यात शेवटच्या टप्प्यात मालेगाव व नाशिकमधून यात्रा जाणार आहे. मार्च महिन्यात ही यात्रा जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तसेच जनआंदोलन म्हणून काँग्रेसतर्फे भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी तीन हजार ५७० किमी लांबीची पदयात्रा झाली. या दरम्यान राहुल गांधी यांनी विविध स्तरांतील नागरिकांशी संवाद साधला. आता दुसऱ्या टप्प्यात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येत आहे. यात मणिपूर ते मुंबई असा सहा हजार ७१५ किमी लांबीचा प्रवास आहे. १४ जानेवारी ते २० मार्च या ६६ दिवसांच्या कालावधीत ही यात्रा पूर्ण करण्यात येणार आहे. कमी दिवसांत अधिकाधिक नागरिकांशी संवाद साधता यावा, या दृष्टीने या यात्रेत गांधी हे पायी कमी चालणार असून, जास्तीत जास्त प्रवास बसने करण्याचे नियोजन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. ही यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) अखेरच्या टप्प्यात मार्च महिन्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व नाशिक येथून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा व आठ विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महाराष्ट्रात ४७९ किमी मार्गक्रमण  (Bharat Jodo Nyay Yatra)

गुजरात राज्यातून महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर पाच दिवस महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक, ठाणे या मार्गे मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्रातील ४७९ किमी अंतर यात्रेत समाविष्ट करण्यात आले आहे. १५ मार्चला यात्रा महाराष्ट्रात येण्याची शक्यता असून, २० मार्च रोजी मुंबईला समारोप होणार आहे.

हेही वाचा :

The post मालेगाव, नाशिकमधून जाणार 'भारत जोडो न्याय यात्रा' appeared first on पुढारी.