लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकुण १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने चौरंगी लढत होईल. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने आहे. तर दिंडोरीमध्ये माघारीनंतर १० जण निवडणूकीत राहिले असले तरी खरी लढत महायुती व महाआघाडीतच असणार आहे.

लोकसभा निवडणूकीत सोमवारी (दि.६) माघारीचा महत्वपूर्ण टप्पा पार पडला. अवघ्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या नाशिक मतदारसंघात पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये शिवसेनेचे विजय करंजकर, भाजपचे अनिल जाधव व राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांच्यासह अन्य दाेघांनी निवडणूकीत त्यांचे अर्ज माघार घेतले. त्यामूळे निवडणूकीच्या रिंगणात ३१ उमेदवार आहेत. मात्र, खरी लढत महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, वंचितचे करण गायकर व अपक्ष शांतीगिरी महाराज यांच्यामध्ये असेल.

दिंडोरीतून माकपाचे जे. पी. गावित व भाजपाचे हरिशचंद्र चव्हाण या प्रमुख उमेदवारांसह अन्य तिघांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूकीच्या रिंगणात अंतिमत: दहा उमेदवार उरले आहेत. या ठिकाणी भाजपच्या डॉ. भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत असेल. दरम्यान, माघारीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह उमेदवार व त्यांचे समर्थक ठाण मांडून होते. दुपारी ३ वाजता माघारीची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना लागलीच निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. येत्या २० तारखेला दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामूळे उमेदवारांना आता प्रचारासाठी पुढचे बारा दिवस घाम गाळावा लागणार आहे.

-नाशिकमध्ये ३१ उमेदवार रिंगणात
-दिंडोरीत १० उमेदवार आजमावणार नशिब
-महायुती, महाविकास आघाडीसाठी परिक्षा